You are currently viewing आंतरजातीय विवाह व चव्हाण कुटुंबीयांचा न्यायिक लढा.

आंतरजातीय विवाह व चव्हाण कुटुंबीयांचा न्यायिक लढा.

सुनिता व दत्तात्रय चव्हान हे बौद्ध दाम्पत्य व त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्यावर झालेल्या जातीय अन्याया विरोधात संविधानिक मार्गाने लढा देत आहेत. दापोडी ता.दोंड जि. पुणे येथे कुटुंबासोबत राहणारा चव्हाण दाम्पत्याचा मोठा मुलगा ऋषिकेश हा पोलीस भरतीचा अभ्यास करत होता, तर, ऋषिकेश चा लहान भाऊ, ऋतुराज हा कला शाखेच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होता. दत्तात्रय व सुनिता हे मजुरी करून आपला संसार सुखाने चालवीत होते. ऋतुराज याने केलेल्या आंतरजातीय लग्नाला जातीवाद्यांकडून झालेल्या विरोधामुळे चव्हाण कुटुंबियांना भयंकर आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. 

विसृत घटना पुढील प्रमाणे आहे. – 

ऋतुराज व ए. क.  या गावातच राहणाऱ्या तरुणीचे प्रेमसंबंध जुळले.  मुलगी धनगर जाती मधील असल्यामुळे बौद्ध आलेल्या ऋतुराज व ए. क. यांच्या लग्नास ए क. च्या कुटुंबाचा विरोध होता. ए. क. चे कुटुंबीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. चंदनाचा व अमली पदार्थाचा अवैध्य व्यापार ते करतात अशी सर्वत्र चर्चा आहे. चंदन तस्करीचे बरेच गुन्हे ए. क. च्या वडिलांवर नोंद आहेत. गावामध्ये एक. क. च्या कुटुंबीयांची दहशद आहे. असे असूनही ऋतुराज व ए. क. यांनी धाडस केले व मुंबई येथे पळून जाऊन लग्न केले. 

ए. क. चे वडील र. के. य यांनी आपल्यामुलीला ऋतुराज पासून वेगळे करण्यासाठी मुंबई गाठली. बरेचवेळा समजवायचा प्रयत्न केला. शेवटी ती ऐकत नाही म्हणून पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. देवनार पोलीस स्टेशन, मुंबई येथील पोलिसांनी सर्व केस चा शहानिशा करून व मुलगी ए. क. हिचे मत लक्षात घेऊन ए. क. व ऋतुराज यांच्या वैवाहिक जीवनात हसपक्षेप करून नये असे र . क.  यांना सांगितले. पारतंतू जातीय द्वेषाने पछाडलेले र. क. व कुटुंबीय शांत बसू शकले नाहीत. आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा वापर करत र.  क. यांनी स्वतःच त्यांच्या मुलीचे दिनांक २० नोव्हेंबर २०२१ ला अपहरण केले. त्याबाबत गुन्हा क्रमांक ७६१/२०२१ देवनार पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आला.  पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ए. क. चा तपास लागला. सर्व तपासाअंती ए. क. व ऋतुराज यांना एकत्र राहायचे आहे व त्याबाबत ए. क. हिच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही याची खात्री पटल्यानंतर देवनार पोलिसांनी ए. क. व ऋतुराज यांना एकत्र राहण्यास परवानगी दिली. 

 पुढे ऋतुराज व ए. क. ऋतुराज च्या घरी, म्हणजे आपल्या गावी गेले. तेथे ऋतुराज व त्याचा मोठा भाऊ ऋषिकेश यांनी एकत्र मिळून भाजी विक्री चा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी कर्ज काढून त्यांनी छोटी माल वाहू गाडी विकत घेतली. कटुंब व उद्योग चार महिन्याहून अधिक काळ सुरळीत चालू होता. परंतु १३ मार्च ला ऋतुराज विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गांजा तस्करीचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. ऋतुराज च्या गाडीत ११ किलो गांजा सापडल्याचा आरोप करण्यात आला. १३ मार्च पाससून आज दिनांक २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऋतुराज कारागृहात मध्ये आहे. 

अर्थातच भाजी व्यापार करणाऱ्या ऋतुराज ला गांजा व्यापारी ठरवण्याची किमया जातीय द्वेषाने पेटलेल्या र. क. यांचीच होती. ऋतुराज कारागृहात असताना, अचानक र. क. यांनी त्यांच्या साथीदारांसह दत्तात्रय चव्हाण व कुटुंबियांवर त्यांच्या राहत्या घरी हल्ला केला. त्यात कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत नव्वद हजार रुपये घरातून चोरण्यात आले व पुन्हा एकदा ए. क . हिला जबरदस्तीने र. क . घेऊन गेले. 

त्याच दिवशी दिनांक २९/०३/२०२२ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ व भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांच्या अनुसार यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. २६९/२०२२ नोंदवण्यात आला. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हतबल झालेल्या रिपब्लिकन बहुज आघाडी, कारवा अशा सामाजिक संघटनांच्या मदतीने दिनांक ०१/०४/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण यांची चव्हाण कुटुंबीयांनी प्रत्यक्ष भेट घेतली. परिणामी र. क. च्या कुटुंबीयांनी यवत पोलीस स्टेशन येथे ए. क. ह्यांना हजार केले. पोलिसांकडे स्वेच्छेनं चव्हाण कुटुंबियांसोबत राहण्यास जात आहे असे सांगून चव्हाण कुटुंबियांसोबत गेलेली र. क. दोनच दिवसात पुन्हा तिच्या आई वडिलांकडे गेली. 

नोंद गुन्हा २६९/२०२२ यवत पोलिसांकडून कुठलीही कार्यवाही केली जात नाही. तसेच आरोपी ला अटक होत नाही. इत्यादी बाबत लेखी अर्ज दाखल करून व पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन चव्हाण कुटुंबीय व सामाजिक संघटना दबाव वाढवत होत्या. त्यातच दिनांक १२/०४/२०२२ रोजी दत्तात्रय चव्हाण राहत्या घरातून रात्री साधारण ३ ते ६ या वेळेत गायब झाले असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. पुढे दिनांक २२/०५/२०२२ रोजी म्हणजे साधारण ४० दिवसानंतर औरंगाबाद येथे त्यांचा तपास लागला त्यावेळी र. क. यांनीच त्यांचे अपहरण केले होते हि बाब स्पष्ट झाली. 

दरम्यान च्या काळात आरोपी र. क. यांना अटक झाली. न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी बराच काळ चालू राहिली परंतु अखेर आरोपीला जामीन मिळाला. 

न्यायासाठी चव्हाण कुटुंबीयांचा लढा अजूनही सुरूच आहे. त्यातच सध्या आई वडिलांसोबत राहणाऱ्या ए. क. हिने ऋषिकेश व कुटुंबियांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. ऋषिकेश सध्या अटक टाळण्यासाठी फरार आहे तर ऋतुराज “गांजा तस्करी” च्या आरोपाखाली कारागृहात आहे. 

आंतरजातीय लग्न करण्याच धाडस दाखवणाऱ्या ऋतुराजला व्यवस्था चिरडू पाहत आहे. चव्हाण कुटुंबीय ठाम पनाने त्यांच्या न्यायची लढाई लढत आहेत.

– भाविक कांबळे, रागिणी वावरे, अमित तिखाडे .

 

Dattray Chavan and Rushikesh ChavhanChavan Family and Lawyers outside Baramati Session Court

Spread the News

Leave a Reply